आकुर्डी (Pclive7.com):- ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री. शि.द. फडणीस यांना यंदाचा २०२४-२५ चा डॉ.डी. वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित आकुर्डी येथील डॉ.डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टस् अँड क्राफ्ट्सच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती प्राचार्य जयप्रकाश कलवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दि.२९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व कलादालन, पुणे येथे होणाऱ्या स्कूल ऑफ अप्लाइड आर्टस् & क्राफ्ट्स, डी.वाय पाटील इंटरनॅशनल विद्यापीठ, आकुर्डी, पुणे व डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्टस् अँड क्राफ्ट्स महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
यावेळी जगप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव हे उद्घाटक अध्यक्ष असणार आहेत. यात उपयोजित कलेतील ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वार्षिक कलाकृती सादर होणार आहेत. दि.२९ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत हे कला प्रदर्शन सर्वांसाठी नि:शुल्क खुले असणार आहे. पुरस्कार सोहळ्याला जास्तीत जास्त कलारसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.
आपल्या ठसठशीत आणि लयबद्ध शैलीने फडणीस यांनी सात दशकांहून अधिक वर्षे वाचकांना मंत्रमुग्ध केले आहे. व्यंग्यचित्रे ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज फडणीसांच्या चित्रांनी खोटे ठरवले. विसंगती टिपणारे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या व्यंग्यचित्रांतून रेखाटले, आणि विसंगतीतून किती निर्विष, सुखावणारा विनोद निर्माण करता येतो, याचा वस्तुपाठ घालून दिला. त्यांच्या शब्दविरहित चित्रांनी अनेक नियतकालिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठे सजली. पु. ल. देशपांडे, चिं.वि. जोशी यांच्यासारख्या दिग्गज लेखकांच्या पुस्तकांची लज्जतही त्यांच्या चित्रांनी वाढवली. अशा अतुलनीय कार्यासाठी श्री. शि.द. फडणीस यांना यंदाचा २०२४-२५ जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी वयाची शंभरी गाठली आहे.






















Join Our Whatsapp Group