पिंपरी (Pclive7.com):- एकाचा जामीन अर्ज रद्द करावा, या मागणीसाठी पोलिस ठाण्यात आलेल्या एका नागरिकाने फौजदाराला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि.२) रात्री आठच्या सुमारास हिंजवडी पोलिस ठाण्यात घडली.

मधुकर रतिकांत जगताप (४७, रा. सांगवडे, मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मधुकर जगताप हा तुषार नथू जगताप (रा. – सांगवडे) या व्यक्तीचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याबाबतचा अर्ज घेऊन आला होता. त्या वेळी फिर्यादी ज्ञानेश्वर झोल हे ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य पार पाडीत होते. आरोपी मधुकर जगताप याचा अर्ज त्यांनी घेतला. त्या वेळेस आरोपी मधुकर याने तुषार जगताप हा गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज टाकत आहे. तुम्ही त्याला आत्ताच माझ्यासमोर फोन करा, असे सांगितले. मात्र, ही घटना परंदवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे तुम्ही त्या पोलिस स्टेशनला वेगळा अर्ज द्या किंवा तक्रार नोंदवा, असे उपनिरीक्षक झोल यांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या आरोपी मधुकर जगताप याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यांच्या अंगाशी झटापट करून त्यांच्या पॅन्टच्या खिशाचे बटन तोडले.

आरोपी मधुकर जगताप याला समजावण्यासाठी इतर पोलिस कर्मचारी आले असता तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुझी वर्दी उतरवतो, अशी धमकी दिली. तसेच तू बाहेर भेट तुला दाखवतो अशीही धमकी दिली. आरोपीने फिर्यादी ज्ञानेश्वर झोल हे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद आहे.






















Join Our Whatsapp Group