पिंपरी (Pclive7.com):- विधानपरिषद आमदार अमित गोरखे व त्यांच्या समर्थकांकडून माझ्या व कुटुंबियांच्या जिवीताला धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी पिंपरी पोलीस स्टेशनला दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून हे कृत्य करणाऱ्या योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देखील मारुती भापकर यांनी केली आहे.

पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तनिष्का प्रशांत भिसे या गर्भवती महिला प्रसूतीसाठी २८ मार्च रोजी गेल्या होत्या, त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या कुटुंबियाकडे डिपॉझिट दहा लाख रुपये भरण्याची मागणी केली. मात्र या महिलेला अन्य रुग्णालयात दाखल करताना या महिलेने दोन मुलींना जन्म दिला. मात्र दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

हा गंभीर प्रकार २८ मार्च रोजी घडलेला असताना आमदार अमित गोरखे यांनी या संदर्भात ३ एप्रिलला प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावरून काही प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी याबाबत मला प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर मी हा प्रकार २८ तारखेला घडला, त्यावर आमदारांनी ३ तारखेला प्रतिक्रिया व्यक्त केली. ते त्यांच्या गावाला धार्मिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त राहिले. त्यामुळे या सर्व दुर्दैवी घटनेला दिनानाथ मंगेशकर रुग्णालय त्यांचे व्यवस्थापन व असंवेदनशील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या प्रतिक्रियेनंतर शनिवारी (दि.५) मला सायंकाळी सहा वाजल्यापासून विधानपरिषद आमदार अमित गोरखे याचे समर्थक मोबाईलवर गलिच्छ भाषेत शिवीगाळ करीत आहेत. ते जाहीर माफी मागा नाहीतर परिणामाला सामोरे जा, अशा धमक्या देत आहेत. राज्यभरातील बीड, पंढरपूर, यवतमाळ आदी भागातील त्यांच्या कार्यकत्यांकडून मला धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून हे कृत्य करणाऱ्या योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group