पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात सोने आणि चांदी चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिक १ च्या पथकाने २४ तासाच्या आत चोराला जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून १६ लाख ९२ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. भोसरी एमआयडीसी परिसरात ११ तारखेला चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने सीसीटीव्ही तपासत ३८ वर्षीय गंगाधर तेलशिंगे याला मोशी मधून अटक केली आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार युनिट १ च्या पथकाने दि.११ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.
या प्रकरणी तांत्रिक विश्लेषण व घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटली. पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत असताना गंगाधर रावसाहेब तेलशिंगे (वय ३८, रा. केसर ट्री टॉऊन, विंग ए-२, प्लॅट नं. ९०३, भारतमाता चौकाजवळ, मोशी, पुणे) याच्यावर संशय बळावला.

दि.१२ एप्रिल रोजी तो के. एस. बी. चौकातील बीआरटी बस स्टॉपजवळ संशयास्पदरीत्या थांबलेला दिसून आला. त्याने शर्टच्या आत काही वस्तू लपवल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाल्यानंतर युनिट १ च्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार महादेव जावळे, गणेश महाडीक, सचिन मोरे, प्रमोद गर्जे व तानाजी पानसरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे २५ तोळे सोन्याचे व १६० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण १६ लाख ९२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे ही कारवाई गुन्हा घडल्यानंतर केवळ २४ तासांत करण्यात आली.
ही उल्लेखनीय कामगिरी गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार महादेव जावळे, गणेश महाडीक, सचिन मोरे, प्रमोद गर्जे आणि तानाजी पानसरे यांनी केली आहे.