पिंपरी (Pclive7.com):- फटाक्यांसारखा आवाज वाढवून शहराची शांतता भंग करणाऱ्या व ध्वनी प्रदूषण वाढविणाऱ्या तब्बल ४ हजार ८५३ बुलेट चालकांविरोधात गुन्हे दाखल करून तब्बल ४८ लाख ४९ हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात आली होती. ही कारवाई १ जानेवारी ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत केली आहे. दरम्यान जप्त केलेल्या ५४२ बुलेटच्या सायलेन्सरवर पोलिसांनी बुलडोझर फिरवून बुलेट राजांना मोठा दणका दिला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहनामध्ये अनाधिकृत हस्तक्षेप करून विशेषतः बुलेट मोटारसायकलचे सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहन चालकांवर पिंपरी चिंचवड वाहतुक शाखे अंतर्गत वाहतुक विभागांकडून नियमितपणे कारवाई करण्यात आली. १ जानेवारी ते १० एप्रिल २०२५ रोजी पर्यंत अनाधिकृतपणे वाहनामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या वाहन चालकांवर एकूण ४ हजार ८५३ केसेस करून तब्बल ४८ लाख ४९ हजार रुपये एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नुकतीच पोलीस निरीक्षक, विश्वजीत खुळे, निगडी वाहतूक विभाग यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेल्या ५४२ सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले.






















Join Our Whatsapp Group