आळंदी (Pclive7.com):- श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (७५० वा) सुवर्ण महोत्सवाचा आज, शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी शुभारंभ अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

सकाळी ६ वाजता हजारो भाविकांच्या जयघोषात परायण सोहळ्याची सुरुवात झाली, ज्यात सुमारे सात हजार भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह डॉ. नारायण महाराज जाधव, संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, डॉ. भवार्थ देखणे, चैतन्य महाराज लोंढे (कबीर महाराज )ऍड. रोहिणी पवार, ह.भ.प. पुरुषोत्तम दादा पाटील यांसारख्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. याव्यतिरिक्त माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, वैजयंती उमर्गेकर, बबनराव कुऱ्हाडे, नंदकुमार कुऱ्हाडे, संजय महाराज घुंडरे आणि आळंदी ग्रामस्थांसह असंख्य भाविक या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार बनले.
महोत्सवाची सुरुवात श्री विणा पूजन आणि ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’ यांच्या विधिवत पूजनाने झाली. यामुळे संपूर्ण आळंदी नगरी भक्तिरसात तल्लीन झाली असून, येत्या काही दिवसांमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.