वाकड (Pclive7.com):- गांजा विक्रीसाठी जात असलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ३१८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (१ मे) सायंकाळी शंकर कलाटे नगर वाकड येथे करण्यात आली.
अजय प्रकाश पवार (१९, वाकड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने हा गांजा पुनीतकुमार शेट्टी (वाकड) याच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे शेट्टी याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कलाटे नगर रोडवर एक तरुण संशयितरित्या जात असताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीची पाहणी केली असता त्यामध्ये ३१८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त आढळून आला. पोलिसांनी गांजा, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ८२ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अजय पवार याला पुनीतकुमार शेट्टी याने विक्रीसाठी गांजा दिला असल्याचे समोर आले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.