पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील भूजल साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. वाढती लोकसंख्या, नव्या गृहनिर्माण प्रकल्पांचा भडिमार, तसेच पाण्याचा अनियंत्रित वापर यामुळे भूजल पातळी सतत खालावत चालली आहे. यामुळे अनेक भागांतील बोरवेल्स कोरडे पडले असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई गंभीर स्वरूप घेत आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात ‘Water Positive PCMC’ या संकल्पने अंतर्गत काम करणाऱ्या टीमने महापालिका आयुक्तांकडे तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात भूजल साठा वाढवण्यासाठी पुढील उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
# शहरातील सर्व बोरवेल्सची मोजणी करावी.
# प्रत्येक बोरवेलवर जलमीटर बसवून भूजल उपशावर नियंत्रण ठेवावे, ज्यामुळे अनिर्बध जलउपश्यावर नियंत्रण ठेवता येईल.
# गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करावी व तांत्रिक-आर्थिक मदतीची तरतूद करावी.
# ज्या सोसायट्यांमध्ये ही प्रणाली कार्यरत नाही, तेथे महापालिकेच्या मदतीने ती सुरू करावी.
# सर्व सार्वजनिक इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अनिवार्य करावे.
# शहरातील स्टॉर्म वॉटर लाईन्समध्ये ठराविक अंतरावर पाणी मुरण्याच्या योजना आखाव्यात.
# फुटपाथ व मोकळ्या पार्किंग जागांमध्ये पाणी मुरणारे वॉटर परमेयेबल सिमेंट-काँक्रिट वापरावे, त्यासाठी शासकीय मार्गदर्शन आणि प्रोत्साहन द्यावे.

संकल्पनेचे समन्वयक गणेश बोरा यांनी सांगितले की, “शहराच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा शोधण्यासाठी शहरातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडणे आवश्यक आहे. योग्य नियोजन आणि प्रभावी उपायांमुळे भूजल साठा वाढवता येऊ शकतो.”
‘Water Positive PCMC’ हे व्यासपीठ शहरात शाश्वत आणि मुबलक पाणी साठा निर्माण करण्यासाठी उपाययोजना व जनजागृती राबवत आहे. त्यांनी प्रशासनासोबत समन्वयाने काम करण्याची तयारी दर्शवली असून, भविष्यातील पाणी संकटकाळ टाळण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.