दररोज सुमारे २ लाख ४० हजार प्रवासी घेत आहेत लाभ
पिंपरी (Pclive7.com):- पुणे महानगर क्षेत्रातील ११ लाख पीएमपीएमएल प्रवाशांपैकी सुमारे २२ टक्के प्रवासी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अर्थात बीआरटीएस कॉरिडॉरचा वापर करीत आहेत. पीएमपीएमएलच्या उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या बीआरटीएसमार्फत दररोज २ लाख ४० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे ही सेवा पिंपरी चिंचवड शहरातील अत्यावश्यक सार्वजनिक वाहतूक सेवा ठरली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये सध्या निगडी-दापोडी, दिघी-आळंदी, सांगवी-किवळे, काळेवाडी-चिखली आणि नाशिक फाटा-वाकड असे पाच बीआरटीएस कॉरिडॉर कार्यरत आहेत. हे कॉरिडॉर शहराच्या पूर्व – पश्चिम व उत्तर – दक्षिण भागांतील महत्त्वाच्या जवळपास १११ मार्गांना जोडतात. त्यामुळे ही सेवा एकप्रकारे पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक रचनेचा कणा ठरत आहेत. शहरातील अंदाजे सुमारे ९६ टक्के लोकसंख्या बस थांब्याच्या ५०० मीटर अंतरात राहते. बीआरटीएसच्या स्वतंत्र मार्गिका आणि प्रवाशांची गर्दी असणाऱ्या वेळेत बसची दीड ते सहा मिनिटांच्या फ्रीक्वेन्सीमुळे प्रवासाचा वेळ कमी होत असल्याने प्रवाशांकडून ही सेवा वापरण्यात प्राधान्य दिले जात आहे. तसेच बसला गर्दी होत असल्याने रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे.
वाहतूक सेवेची क्षमता वाढवली जाणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सार्वजनिक वाहतूक ताफ्यात वाढ करण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. विविध योजना आणि खरेदी मोहिमांद्वारे एकूण 2,400 बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट केल्या जात आहेत. यामध्ये पीएमपीएमएलने आधीच खरेदी केलेल्या 400 नवीन सीएनजी बसांचा समावेश आहे, तसेच पीएमआरडीएकडून 500 बस आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या सहाय्याने आणखी 500 बस उपलब्ध होणार आहेत. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या योजनांतून आणखी 1,000 बस मिळण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार, पुणे आणि पिंपरी चिंचवडसारख्या शहरांनी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीत चालण्यासाठी २०३१ पर्यंत ८ हजार १०० बसेस उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यादृष्टिनेही नियोजन करण्यात येत आहे.
कॉरिडॉरनुसार अशी सुरू आहे सेवा
निगडी–दापोडी कॉरिडॉर : दररोज एकूण बस फेऱ्या १ हजार ८०० पेक्षा जास्त, तर प्रवाशांची संख्या ९० हजारांपेक्षा जास्त.
दिघी-आळंदी कॉरिडॉर : दररोज एकूण बस फेऱ्या १ हजार १०० पेक्षा जास्त, तर प्रवाशांची संख्या ६५ हजार ८०० पेक्षा जास्त.
सांगवी-किवळे कॉरिडॉर : दररोज एकूण बस फेऱ्या १ हजार १०० पेक्षा जास्त, तर प्रवाशांची संख्या ५९ हजार ५०० पेक्षा जास्त.
काळेवाडी–चिखली कॉरिडॉर : दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त.
नाशिक फाटा-वाकड कॉरिडॉर : दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १० हजार ६०० पेक्षा जास्त.
पाच कॉरिडॉरवर मिळून दररोज होणाऱ्या एकूण बस फेऱ्या सुमारे ४ हजार ६०० व एकूण प्रवासी संख्या २ लाख ४५ हजार.
पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विस्तार पाहता बीआरटीएस सेवा ही आपल्या शहरासाठी अत्यावश्यक सेवा आहे. लाखो लोक दररोज या सेवेचा लाभ घेत असून सर्वांना परवडणारी व विश्वासार्ह ही वाहतूक सेवा आहे. आगामी काळात बीआरटीएस कॉरिडॉरचा विस्तार करणे आणि बसेसची संख्या वाढवणे यावर भर देऊन सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
बीआरटीएस खूप जागा व्यापते, असे वाटत असले तरी प्रत्यक्षात आकडेवारी वेगळं चित्र दाखवत आहे. निगडी–दापोडी मार्गावर फक्त १५ टक्के रस्त्याच्या जागेचा वापर बीआरटीएस करत असून प्रत्येक तासाला येथे सुमारे ५ हजार ६०० प्रवासी सेवेचा लाभ घेत आहे. तर मिश्र वाहतुकीसाठी असणाऱ्या ५२ टक्के रस्त्यावर केवळ ७ हजार २०० प्रवाशांची वाहतूक होते. या आकडेवारीवरून बीआरटीएसची कार्यक्षमता दिसून येते.
– बापू गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका