पिंपरी (Pclive7.com):- नक्षत्रचं देणं काव्यमंच, मुख्यालय भोसरी, पुणे ३९ च्या वतीने नुकतेच ‘आठवे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन २०२५’ अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव, पुणे येथे साजरे झाले. या महाकाव्य संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक कवी कवत्रिंनी आपली उपस्थिती दाखवून, हे महाकाव्यसंमेलन यशस्वी केले. संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने या आठव्या महाकाव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

दोन दिवसाच्या या महाकाव्यसंमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ बोल्ड कवी म.भा. चव्हाण पुणे हे उपस्थित होते. तसेच या महाकाव्यसंमेलनच्या व्यासपीठावरून शिवव्याख्याते प्रा. नामदेवराव जाधव, प्रा. तुकाराम पाटील, श्रीकांत चौगुले, डॉ.शांताराम कारंडे, डॉ. अलका नाईक, सुखदेव तात्या सोनवणे, राजेंद्र धावते, सुरेश कंक, सुभाष चव्हाण, कैलास भैरट, प्रा. सुरेखा कटारिया, कल्पना बंब,ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
महाकाव्यसंमेलनाची सुरुवात दि.१७ मे रोजी काव्यग्रंथदिंडीने करण्यात आली. मराठी भाषेच्या जय घोष करत काव्य ग्रंथ दिंडी सभागृहा पर्यंत काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरण संदेश देत वृक्ष पूजन करून झाडाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते महाकाव्यसंमेलन उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाकाव्यसंमेलनाध्यक्ष बोल्ड कवी म.भा. चव्हाण, डॉ. शांताराम कारंडे, डॉ. अलका नाईक आदी उपस्थित होते. या महाकाव्यसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. श्वेता राठोड यांनी केले. सर्व मान्यवरांच्या संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह, गुलाब पुष्प, शाल देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महाकाव्यसंबंधाची प्रस्ताविक नक्षत्राचं देणं काव्यमंचचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी केले. यावेळी ते म्हणाले की,”कविता आदर व सन्मान मिळण्यासाठी पंचवीस वर्षांपूर्वी या संस्थेची १ जानेवारी १९९९ या शुभदिनी स्थापना केली. संपूर्ण महाराष्ट्रात या संस्थेने आपल्या कार्याचा विस्तार केला. एक विचारवंत, कवी, साहित्यिक या मंचाशी जोडले गेले. एक चांगल्या माणसांची मोठी चळवळ या माध्यमातून उभी राहिली. अनेक अडचणी आणि अनेक संघर्ष करत संस्थेची वाटचाल प्रेरणादायक आहे. संकटांनो याद राखा..! या कवीशी गाठ आहे. असे सांगून त्यांनी संस्थेच्या विविध कामांचा आढावा घेतला. काव्य सहली, काव्य कार्यशाळा, गझल कार्यशाळा, श्रावणी मैफल, राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा, वासंतिक काव्य मैफल, प्रेम काव्य मैफल, काव्यसंग्रह प्रकाशन, गड किल्ले, निसर्गाच्या सानिध्यात निघणाऱ्या विविध सहलीं आणि कवींना एक आदर मिळून देणारे व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे पंचवीस वर्षाची वाटचाल केवळ कवितेसाठी काम करणारी महाराष्ट्रातील एक क्रियाशील संस्था राहिली. त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.”
यावेळी महाकाव्यसंमेलनाचे संमेलनाध्यक्ष बोल्ड कवी म.भा. चव्हाण म्हणाले की, “कविता म्हणजे एक आनंदाचं ठिकाण आहे. मनाला उभारी देणार माध्यम आहे. ज्यांना कवितेचा स्पर्श केलेली माणसे आनंदी होतात. संस्थेने २५ वर्ष हा काव्याचा यज्ञ तेवत ठेवून समाजातील संवेदशीलता जपण्याचं काम केलं आहे. एखाद्या संस्थेचा एवढा मोठा कार्यकाल म्हणजे त्या कार्याची सातत्यपूर्ण असलेली पावतीच आहे. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून संस्था काम करत आहे. चांगल्या माणसांचा समूह या माध्यमातून समाजामध्ये घडत आहे. आणि कवींना घडवण्याचं काम या व्यासपीठांनी केला आहे. अनेक कवी साहित्यिक आणि विचारवंत या व्यासपीठावरून पुढे आलेले आहे. नवोदित कवींच्या हक्काचा आणि सन्मानाचं व्यासपीठ म्हणून या व्यासपीठाकडे समाजातून पाहिले जाते. मी गेले या संस्थेच्या २५ वर्षाच्या वाटचालीचा साक्षीदार आहे. अनेक चांगल्या माणसांचा समूह म्हणजेच ही संस्था म्हणायला काही हरकत नाही. समाजातील संवेदनशीलता टिपण्याचे काम .या माध्यमातून केले गेले आहे. संस्थेच्या विविध कार्यक्रमामुळे मराठी भाषेची अस्मिता जागृत ठेवण्याचं काम आणि मराठी भाषेची समृद्धता वाढवण्याचे काम या संस्थेने सातत्यपूर्ण केले आहे. या संस्थेला शासन दरबारी मान्यता देऊन ,तिच्या कार्याची दखल घेऊन ,संस्थेला भरीव अशा प्रकारचे सहकार्य केले पाहिजे. अनेक माणसांचा समूह जोडणारी ही समाजातील क्रियाशील संस्था आहे. भविष्यातील न विचाराची क्रांती या व्यासपीठावरून नक्कीच होईल. त्यानिमित्त मी अपेक्षा व्यक्त करतो. तळागाळातील, खेडोपाडी आणि वाडीवस्तीतील कवी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे .संपूर्ण महाराष्ट्रातून या कवींची उपस्थिती म्हणजेच संस्था कुठपर्यंत पोहोचली आहे. याची पावती मिळते. पिंपरी चिंचवड कवितेची राजधानी करणारी ही संस्था सर्वांच्या कौतुकास पात्र आहे.”
या महाकाव्यसंमेलनामध्ये आलेल्या संपूर्ण कवींना चहा, नाष्टा,भोजन,निवास व्यवस्था ही विनामूल्य करण्यात आली होती. प्रत्येक सहभागीला स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र,शाल,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. दोन दिवसांच्या या महाकाव्यसंमेलनात पहिल्या दिवशी दि.१७ मे २०२५ मध्ये पाच काव्य मैफल व दोन परिसंवाद संपन्न झाले. तसेच दुसऱ्या दिवशी दि.१८ मे २०२५ रोजी अध्यक्ष प्राध्यापक तुकाराम पाटील हे होते.
समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये महाकाव्यसंमेलनाचे संमेलनाध्यक्ष बोल्ड कवी म.भा. चव्हाण यांना संस्थेच्या वतीने मानपत्र, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व पंचवीस हजाराची मानधन ठेवली घेऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी सुखदेव तात्या सोनवणे, श्रीकांत चौगुले, सौ प्रीती सोनवणे, प्रा.तुकाराम पाटील, बंडोपंत बोढेकर, अंजू सोनवणे, वृषाली टाकळे, जया बोरकर, डॉ. अलका नाईक इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महाकाव्यसंमेलनाध्यक्ष कवी म.भा.चव्हाण, पुणे यांच्या शुभहस्ते सहभागी झालेल्या प्रत्येक कवीला आणि कवयित्रींना गौरवचिन्ह,सन्मानपत्र, गुलाबपुष्प व शाल देऊन गौरवण्यात आले. दोन दिवसाच्या सोहळ्यामध्ये सर्वजण भारावून गेले. दोन दिवसांचा हा सोहळा अतिशय उत्साहामध्ये हा सोहळा निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव, पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये
यशवंत घोडे, बालाजी थोरात, सुनिल बिराजदार, नवनाथ पोकळे, डॉ. गिरीश सकपाळ, बबन चव्हाण, दिगंबर वाघिरे, विनायक विधाटे,प्रणव रोकडे, सुहास जगताप, सचिन कुलकर्णी, डॉ. पांडुरंग भोसले, रूपाली भालेराव, दिव्या भोसले, नरेंद्रकुमार चव्हाण, जुली यादव, सुरेखा कटारिया, सुरेश कंक, नरेंद्र कुमार चव्हाण , सतिश कांबळे, प्रमोद डोंगरदिवे, यशवंत गायकवाड,सुभाष चव्हाण, नितीन लोणारी,सलीम नायकोडी, राजू वानखेडे, दत्तात्रय गायकवाड, प्रकाश दळवी, अक्षय पवार, विवेक कुलकर्णी, साईराजे सोनवणे, किरणताई मोरे, राधाताई वाघमारे इ.नी महाकाव्यसंमेलनाच्या संयोजनामध्ये सहभाग घेऊन यशस्वी केले.
या कार्यक्रमाचा समारोप विश्वगीत पसायदानाने करण्यात आला. या महाकाव्यसंमलनाचे संपूर्ण संयोजन, आयोजन आणि नियोजन नक्षत्राचं देणं काव्यमंचाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे यांनी यशस्वी केले.