पिंपरी (Pclive7.com):- निगडी ते पिंपरी मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पोर्टलँड मशीनने रस्त्यावर खड्डे खोदण्यात येत आहेत. त्या ठिकाणी पुन्हा पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. भक्ति शक्ती उड्डाणपूल श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण रस्त्यावर आज (दि.१९) संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी तातडीने दखल घेऊन मेट्रो प्रकल्प अधिकारी ह्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी दिला आहे.

निगडी येथील भक्ति शक्ती उड्डाणपूल श्रीकृष्ण मंदिर ते निगडी गावठाण रस्त्यावर आज पुन्हा पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. यापूर्वी सुद्धा मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यावर पोर्टलँड मशीनने रस्त्यावर खड्डे खोदण्यात येत असताना पिंपरी चिंचवड महापालिकेची पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.
सध्या उन्हाळा सुरू असून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना सुरळीत आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. दुसरीकडे तीन वेळा मेट्रोचे काम सुरू असलेल्या निगडी भागात काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. वारंवार असे प्रकार घडून सुध्दा संबंधित ठेकेदाराविरोधात महापालिका आयुक्त शेखर सिंह कारवाई करत नाहीत.
मात्र आता पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ निगडी ते पिंपरी मेट्रो प्रकल्प अधिकारी ह्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सचिन काळभोर यांनी दिला आहे.