पिंपरी (Pclive7.co.):- वादातील जमीन पाहण्यासाठी गेलेल्या वकिलाने थेट बंदूक बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडी लगतच्या कासारसाई इथे घडला. याचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे.

बंदूक दाखवणाऱ्या वकिलांचे संदीप भोईर असे नाव आहे. ते धनंजय वाडकर यांचे वकील आहेत. कासारसाई येथील शब्बीर मुलानी आणि वाडकर यांच्यात जमिनीवरून वाद सुरु आहे. मुलानी यांची काही जमीन वाडकरांनी खरेदी केली आहे. मात्र ही जमीन कुळ कायद्यात मोडत असल्याने यासाठी गेली 10 ते 12 वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरु आहे. अशातच आज दुपारी दोनच्या सुमारास वकील संदीप भोईर हे कासारसाईत गेले, तेंव्हा त्या जमिनीच्या ठिकाणी निघाले असता मुलानी कुटुंबात आणि त्यांच्यात वाद झाले.
याच वादात वकील भोईर यांनी कंबरेचे बंदूक बाहेर काढले, तेंव्हा मुलानी कुटुंब आक्रमक झाले. हे पाहून वकील आणि त्यांच्या साथीदाराने तिथून पळ काढला. आता दोन्ही बाजूच्या मंडळींना हिंजवडी पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले असून, पोलिसांकडून चौकशी करुन पुढची कारवाई केली जाणार आहे.
