लोणावळा (Pclive7.com):- भुशी डॅम हे लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. पावसाळा सुरु झाला ही हजारो पर्यटक भुशी डॅमवर वर्षा सहलीची आनंद लुटायला येतात. मात्र, हेच ठिकाण पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे. लोणावळ्याच्या भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून आज (दि.०८) दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अकरा महिन्यांपूर्वीच लोणावळ्याच्या भुशी धरणाच्या बॅक वॉटरजवळच एक भयानक घटना घडली होती. एकाच कुटुंबातील १० जण येथे अडकले होते. ५ जण पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले.

लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या बॅक वॉटर परिसरात धरणाच्या पाण्यात आज बुडून दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. साहिल शेख आणि मोहम्मद जमाल अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी हे तरुण या ठिकाणी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. लोणावळ्याच्या शिवदुर्ग रेस्कयू टीम ने या दोघांचे ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत.

लोणावळ्यात किंवा इतरही पर्यटन स्थळांवर सावधानता बाळगा असा इशारा दिलेला असतो. मात्र, तरीही पर्यटक याकडे कानाडोळा करत असल्याचं वारंवार दिसून येते. गेल्या वर्षी ३० जून रोजी भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद घेत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला अन् त्यामध्ये १० जण अडकले. यावेळी अख्ख कुटुंब डोळ्यादेखत वाहून गेलं होतं.

पर्यटनासाठी पुण्यातून लोणावळ्याला आलेलं कुटुंब भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडालं होतं. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात दहाजण अडकले होते. ५ जणांना बाहेर काढण्यात यश आलं तर पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. धक्कादायक बाब म्हणजे बंदी असताना हे कुटुंब धबधब्याकडे गेले होते.






















Join Our Whatsapp Group