पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात बस पास योजना सुरू करावी अशी मागणी माजी आमदार अश्विनी जगताप यांनी केली आहे. अश्विनी जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

अश्विनी जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी PMPML बस प्रवासाकरिता २५% ते ७५% सवलतीच्या दरातील बस पास योजना सुरू केली होती. विविध अटी आणि नियमांसह ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती.
शहरातील अनेक विद्यार्थी खडकी, पुणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरात शिक्षण घेण्यासाठी जातात. या विद्यार्थ्यांना २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातही PMPML बसेसमधून प्रवास करण्यासाठी २५% ते ७५% सवलतीच्या दरातील बस पास योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी अश्विनी जगताप यांनी आयुक्तांकडे केली आहे.
या मागणीवर तातडीने कार्यवाही करून या योजनेची अंमलबजावणी करण्याची विनंती माजी आमदार अश्विनी जगताप यांनी केली आहे. तसेच, या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती आपल्याला कळविण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या शिक्षणासाठीचा प्रवासाचा खर्च कमी होण्यास मदत होईल, असे मत अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले आहे.