पिंपरी (Pclive7.com):- जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उर्से यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्माईल सायक्लोथॉन’ सायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ४०० हून अधिक सायकलस्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला.

सकाळी ६:३० वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयापासून रॅलीला सुरुवात झाली. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) विशाल हिरे यांनी हिरवा झेंडा दाखवत सायक्लोथॉनचे उद्घाटन केले. एकूण २१ किलोमीटरचा प्रवास करत ही रॅली स्माईल फाउंडेशन, उर्स गाव, पुणे येथे समाप्त झाली.
सायक्लोथॉनमध्ये नागरिक, सामाजिक संस्था प्रतिनिधी, व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यकर्ते आणि फिटनेसप्रेमी सायकलस्वार यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. रस्त्यावरून जनजागृती करत व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले.

या उपक्रमास पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महारनवर, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या अभियानात स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक हर्षल पंडित, सायकलिस्ट सुरज भाट, आयर्न मॅन कझाकस्तान धनराज हेळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश समाजात अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकू न देता, आरोग्यदायी आणि सशक्त जीवनाकडे लोकांचा कल वळविणे हा होता. पोलीस विभागाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमांद्वारे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद आणि सहकार्य अधिक बळकट होत असल्याचे दिसून येते.






















Join Our Whatsapp Group