प्रारूप नकाशामध्ये रस्ता दिसला अन् सोसायटीधारकांच्या हृदयाचा ठोका चुकला; अधिकाऱ्यांनी संभ्रम दूर केला अन् रहिवाशांचा जीव भांड्यात पडला!
पिंपरी (Pclive7.com):- ‘‘ताथवड येथील सोसायटीच्या आवारात डीपी रस्त्याचे आरक्षण पडले…’’ अशी अफवा पसरली आणि सोसायटीधारक 900 कुटुंबियांच्या हृदयाचा अक्षरश: ठोका चुकला. प्रशासनावर संताप झाला. रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि सोसायटीधारक विरोधाचे फलक घेवून रस्त्यावर उतरले… पण, शेवटी सोसायटीधारकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती विशद केली आणि सोसायटीधारकांच्या चेहऱ्यावर समाधान उमटले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने शहराचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी दि. 14 जुलै 2025 पर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. शहरात विविध भागांमध्ये आरक्षणाच्या मुद्यांवरुन आंदोलन, मोर्चे आणि विरोध सुरू आहे. मौजे ताथवडे येथील एलेमेंटा फेज- 1 सोसायटीच्या आवारातच 18 मीटर रस्त्याचे आरक्षण टाकले आहे, असा दावा केला होता. यावर रान पेटले आणि आंदोलन करण्यात आले. सोसायटीधारक अक्षरश: रस्त्यावर उतरले. पण, खरी वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर सोसायटीधारकांचा जीव भांड्यात पडला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप पवार यांनी महानगरपालिका नगर रचना विभागाच्या अनुपमा कुलकर्णी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी एलेमेंटा सोसायटीच्या सचिव स्नेहल फाटिंग, अतुल होनमाने, निखिल रेगे, मज्जुएन्द्र तिवारी, देवेंद्र लाम्बोळे आणि सहकारी उपस्थित होते.

मौजे ताथवडे येथील एलेमेंटा फेज- १ सोसायटीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रारुप विकास आराखड्यामध्ये १८ मीटर रस्ता प्रस्तावित आहे, अशी चर्चा होती. त्यामुळे सोसायटीधारकांनी आंदोलनाची भूमिका घेतली. याबाबत नगर रचना विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये महत्त्वाची बाब अधोरेखित झाली आहे. एलेमेंटा फेज-१ या सोसाटीमध्ये कोणताही नवीन रस्ता प्रस्तावित केलेला नाही. पूर्वीचा सोसायटीचा रस्ता नकाशात दर्शवलेला आहे. परिणामी, सोसायटीधारकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. सदर ९०० सदनिका असलेल्या या सोसयटीमध्ये कोणताही भाग बाधित होत नाही.
एलमेंटा फेज-1 सोसायटीत रस्त्याचे आरक्षण नाही. नकाशामध्ये दर्शवलेला रस्ता ‘एग्झिसटींग रोड’ आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी शहानिशा केली. अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती सोसायटीधारकांना विशद केली. त्यामुळे दिलासा मिळाला. सोसायटीधारकांच्या हक्काच्या जागेवर महानगरपालिका प्रशासनला आरक्षण टाकता येत नाही. ताथवडे-पुनावळे आणि काळाखडक या भागात प्रारुप विकास आराखडा करताना स्थानिक भूमिपूत्र शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकले आहे. यामध्ये शेतकरी भूमिहीन होवू नयेत. यासाठी आग्रही मागणीही या बैठकीत केली.– संदीप पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.






















Join Our Whatsapp Group