पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी गावाने भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत केले असून, संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हालं आहे. पालखीचे स्वागत थाटामाटात करण्यासाठी माजी नगरसेवक संदीप वाघेरे आणि ग्रामस्थांनी कंबर कसली होती.

याविषयी अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले कि, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आज शनिवार दि.१९ जुलै २०२५ रोजी जगद्गृरू संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन पिंपरी गावातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे झाले आहे. यानिमित्ताने पालखी आगमन सोहळ्यासाठी तयारीचा आढावा घेण्यात आला असून, स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि पालखी मार्गावरील रोषणाई व सजावट आदी महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली होती.

संदीप वाघेरे म्हणाले, “संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पिंपरी गावात रांगोळी, ढोल ताशांच्या गजरात तसेच पिंपरी गावातील स्वानंद सुख निवासी जोग महाराज प्रासादिक दिंडी व ओम शिवदत्त प्रासादिक दिंडी, भैरवनाथ भजनी मंडळ व सावता सेवक ट्रस्ट यांच्या भजनाच्या गजरामध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या समन्वयातून या वर्षीचा पालखी सोहळा अधिक भव्य आणि सुस्थितीत पार पडला. या प्रसंगी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्याकरता पंचक्रोशी येथील भाविकांनी अबूतपूर्व गर्दी केली आहे.

पालखी आगमनाच्या दिवशी भाविकांसाठी संदीप वाघेरे व ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा, मदत केंद्रे आणि विश्रांती केंद्र, तसेच नवीन जिजामाता रुग्णालयाच्या वतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थाही उभी करण्यात येत आहे.























Join Our Whatsapp Group