पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून आज (दि.०२) मुद्देमाल परत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात एकूण २३१ तक्रारदारांना सुमारे ६ कोटी रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल परत करण्यात आला.

हा मुद्देमाल केला परत..
33 तोळे सोन्याचे दागिने (17 लाख रुपये किंमत)
6 मोटार वाहने (41 लाख रुपये किंमत)
5 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम
167 मोबाईल हँडसेट्स (30 लाख रुपये किंमत)
अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश होता.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान पोलिसांकडून आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला जातो. न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेस गती देण्यासाठी व सर्व तक्रारदारांना एकत्रितपणे मदत करता यावी म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मुद्देमाल परत मिळाल्यामुळे फिर्यादींनी समाधान, आनंद व कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांनी आपली प्रतिक्रिया देताना पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले व अशा उपक्रमामुळे जनतेचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास अधिक बळकट होत असल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मन:पूर्वक आभार मानले.

या कार्यक्रमात सायबर पोलीस स्टेशनच्या उल्लेखनीय कार्याची दखल घ्यावी लागेल. त्यांनी त्यांच्या तपासात एकूण 5 कोटी 5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यातील फिर्यादींना परत केला. तसेच केंद्र शासनाच्या CEIR पोर्टलवर हरवलेले मोबाईल नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन एकूण 167 मोबाईल जप्त करून संबंधित तक्रारदारांना परत केले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सायबर गुन्ह्यांमध्ये होणाऱ्या फसवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, सायबर गुन्ह्यांमध्ये नागरिक विशेषता ‘ग्रिड अँड फियर’ मुळे सायबर गुन्ह्यांना बळी पडत असतात. त्यांनी ‘डिजिटल अरेस्ट’, ‘डीप फेक’ अशा नव्या स्वरूपाच्या सायबर फसवणूक प्रकारां बाबतची माहिती दिली. गुन्हेगार हे नागरिकांच्या भीतीचा, माहितीअभावी गैरफायदा घेतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे व अशा कोणत्याही प्रकारात अडकले असल्यास घाबरून न जाता तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवावी,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच “चोरीस गेलेली मालमत्ता नक्कीच परत मिळू शकते,” हे उदाहरण आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवावा आणि इतर नातेवाईक व मित्रांनाही योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. काही गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल मिळविण्यास वेळ लागतो, मात्र पोलिसांचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो आणि त्यातूनच यश मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
नवीन फौजदारी कायदे लागू झाल्यानंतर फिर्यादींना मुद्देमाल परत करण्यासाठी असलेल्या तरतुदींचा प्रभावी वापर करून प्रकरणे जलदगतीने निकाली काढली जात आहेत. हा उपक्रम त्याचेच प्रत्यक्ष उदाहरण आहे.
या कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सर्व पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच सुमारे २५० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी केले.






















Join Our Whatsapp Group