पिंपरी (Pclive7.com):- चिखली, पुणे येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलमार्फत प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही देशभक्तीचा उत्सव – भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीने भारलेली ही रॅली COEP तंत्रशास्त्र विद्यापीठ चिखली पासून शाळेपर्यंत काढण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदाडे, पिंपरी आरटीओचे पोलिस निरीक्षक प्रविण भोसले, सहाय्यक निरीक्षक, तेजस्विनी चोरगे व कोमल गाडेकर, तसेच शाळेच्या संचालिका कमला बिष्ट, संचालक डॉ. संजय सिंग, प्रचिती स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील, नूतन महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्रबंधक विजय शिर्के, परिसरातील प्रतिष्ठित जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

विद्यार्थी, शिक्षक, नागरिकांनी हातात तिरंगी ध्वज घेऊन, घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला. यावेळी विद्यार्थ्यांनी “हिंदुस्तान हमारा है, ये हमारी शान है”, “देश की ताकत हम सब बच्चे”, “दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है” अशा जोशपूर्ण घोषणा देत रॅलीला उर्जा दिली.
विद्यार्थ्यांनी क्रांतिवीर, सेनानी, देशभक्त यांच्या वेशभूषात सजून आले होते. ज्यामुळे संपूर्ण वातावरण देशप्रेमाच्या रंगात न्हालं. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले.

शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या रॅलीची सांगता खुल्या मैदानात झाली. रॅली मैदानात दाखल होताच पूर्वप्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात व आनंदात स्वागत केले. तिरंग्याच्या तीनही रंगाचे फुगे आकाशात सोडण्यात आले. तिरंग्याने आकाश सजले, घोषणांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या रंगाने न्हावून निघाले. विद्यार्थ्यांनी भावपूर्ण भजन सादर केले.
यावेळी बोलताना संस्थेचे संचालक डॉ. संजय सिंग यांनी ‘ऑगस्ट क्रांती’ का साजरी करतो याबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

प्रमुख अतिथी अण्णा बोदाडे यांनी शाळेचे कौतुक करत, “विद्यार्थी हेच देशाचे भविष्य आहेत, त्यांना आकाशाला भिडण्याची प्रेरणा द्यावी” असे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’ या गीताने झाला आणि देशभक्तीचा उत्साह अधिक उंचावला. शाळेच्या वतीने रॅली यशस्वी झाल्याबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवरांचे आभार मानण्यात आले. देशप्रेम आणि एकता याचे उत्तम उदाहरण ठरलेली ही तिरंगा रॅली सर्वांच्या मनात देशभक्तीची ज्योत चेतवून गेली.






















Join Our Whatsapp Group