


भारतातील एकमेव विद्यार्थिनी..
येत्या २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात श्रावणीचा प्रवेश निश्चित झाला आहे. १०० टक्के शिष्यवृत्ती मिळवणारी ती महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एकमेव विद्यार्थिनी आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये दर्जेदार आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण असल्याचं श्रावणीच्या निवडीनं सिद्ध झालं आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी श्रावणी हिने महापालिकेच्या शाळेतील शिक्षण, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं आहे. श्रावणी आता अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी जर्मनीला चालली आहे. तसंच या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात ती विज्ञान, गणित, अर्थशास्त्र यासारख्या विषयांचा सविस्तर अभ्यास करणार आहे.

श्रावणीचा पुढील शिक्षणप्रवास जर्मनीतून सुरू होणार..
जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज (UWC) संस्थेच्या रॉबर्ट बॉश कॉलेजेस या संस्थेमार्फत शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्रातून तिची निवड करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेत तिला ९३ टक्के गुण मिळाले आहेत. तिचे वडील खासगी शाळेत क्रीडा शिक्षक आहेत, तर आई देखील खासगी कंपनीत नोकरी करत आहे. आगामी शैक्षणिक सत्रात श्रावणीचा शिक्षणप्रवास जर्मनी येथून सुरू होणार आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजेस या संस्थेची जगभरात विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालये आहेत. संस्थेमार्फत शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात. श्रावणीने अनेक शैक्षणिक व सहशालेय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तिनं शिष्यवृत्ती परीक्षा तसंच हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे. क्रीडा क्षेत्रातही शाळेच्या बास्केटबॉल संघाची ती कर्णधार देखील होती आणि डिस्कस थ्रो या क्रीडाप्रकारात तिनं सुवर्णपदक मिळवलं होतं.

महापालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण..
शिष्यवृत्तीसाठी विविध टप्प्यांवर परीक्षा, चर्चा, मुलाखत आणि उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. श्रावणीच्या नेतृत्वगुणांना, सामाजिक जाणिवेला आणि शैक्षणिक समतेला या निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले गेले. श्रावणीची निवड झाल्यामुळं संपूर्ण शहरासाठी आणि महापालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी गौरवाचा क्षण आहे. श्रावणीने आपली गुणवत्ता, जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. केंद्रित शिक्षणपद्धती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा तिच्या यशात आहे. ‘विद्यार्थी गुणवत्तावाढ उपक्रम’, विशेष मार्गदर्शन सत्रे आणि शाळेतील प्रोत्साहनात्मक वातावरण यामुळेच श्रावणीला आंतरराष्ट्रीय संधी मिळवता आली आहे, असं सांगण्यात आलं.

श्रावणीच्या यशामुळं शिक्षण धोरण अधिक बळकट..
पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक पातळीवर यश मिळवण्याची क्षमता आहे, हे श्रावणीनं दाखवून दिलं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात आम्ही स्थानिक नगरसेवक म्हणून गुणवत्ता, संधी आणि समावेश यांना नेहमीच प्राधान्य दिलं आहे. श्रावणीच्या यशामुळं आमचं शिक्षण धोरण अधिक बळकट झालं आहे. तिचं यश इतर विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल. श्रावणीच्या यशामध्ये शाळेच्या शिक्षकांचं मार्गदर्शन, कुटुंबीयांचं पाठबळ आणि महापालिकेच्या शैक्षणिक उपक्रमांचं मोलाचं योगदान आहे. श्रावणीने मिळवलेली आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती ही केवळ तिच्या कष्टांचीच नव्हे, तर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचीही पोचपावती आहे. ही प्रेरणादायी वाटचाल इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरणार आहे. जर्मनीच्या प्रवासात तिला कसल्याही प्रकारे आर्थिक किंवा शैक्षणिक मदत असेल ही समस्त कासरवाडी नागरिकांकडून आणि माझ्याकडून नेहमी निस्वार्थी भावनेने होत राहील. असं प्रतिपादन स्थानिक नगरसेवक शाम लांडे यांनी केलं.
श्रावणीचं आयुष्य बदलणार..
“माझ्या मुलीला महापालिकेच्या शाळेत केवळ शिक्षणच नाही, तर स्वप्न बघण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. यशामध्ये शिक्षकांचे सततचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि शाळेच्या वातावरणाचा मोठा वाटा आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजमध्ये शिकण्याची संधी मिळाल्यामुळं माझ्या मुलगीचं आयुष्य बदलणार आहे. तिचं हे यश तिच्या शिक्षकांना, कुटुंबाला आणि महापालिकेच्या शिक्षण विभागाला आणि महत्वाचं स्थानिक नगरसेवक शाम लांडे यांना समर्पित करतो.” अशा शब्दात श्रावणीचे वडील दीपक टोणगे यांनी आभार व्यक्त केले आहेत.






















Join Our Whatsapp Group