

पिंपरी (Pclive7.com):- सुरक्षेची साधनसामग्री न पुरवता कामगारांना धोकादायक परिस्थितीत काम करण्यास लावल्याने तीन कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १५ ऑगस्ट रोजी निगडी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी पाच दिवसानंतर ठेकेदार आणि बीएसएनएल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर रमेश शिवाजी पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह बीएसएनएल कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात बीएनएस कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी रमेश पाटील याला बीएसएनएल कंपनीच्या बंद असलेल्या डक्टमधून नवीन ओ.एल.टी.ई. बसवण्यासाठी ऑप्टिकल फायबर पॉइंट काढण्याचे काम करायचे होते. हे काम करताना कामगारांना मास्क, हँडग्लोव्हज, गमबूट आणि श्वसनास त्रास होऊ नये म्हणून आवश्यक ती सुरक्षा साधने पुरवणे गरजेचे होते. मात्र, याची जाणीव असतानाही आरोपीने ही साधने न पुरवता अकुशल कामगारांना काम करण्यास पाठवले. काम करत असताना दत्तात्रय विजयकुमार व्हनाळे, लखन उर्फ संदीप आशरुबा धावरे आणि साहेबराव संभाजी गिरशेट या तीन कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.























Join Our Whatsapp Group