पिंपरी (Pclive7.com):- भोर तालुक्यातील नसरापूर येथे ४ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. घटनेचा निषेध नोंदवत आणि पीडित चिमुकलीला श्रद्धांजली अर्पण करून सभागृहाचे कामकाज तब्बल ३० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

सभेच्या प्रारंभीच नसरापूर येथील घटनेचा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण सभागृहाने उभे राहून मौन पाळत पीडित चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून समाजात संताप आणि हळहळ व्यक्त होत असल्याच्या भावना लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या.

श्रद्धांजली प्रस्तावावेळी विविध पक्षांच्या महिला नगरसेविकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. “अशा नराधमांना समाजात स्थान नाही. आरोपींना कठोरातील कठोर आणि तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” अशी जोरदार मागणी महिला लोकप्रतिनिधींनी केली. काही नगरसेविका बोलताना भावुक झाल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले.

सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. शहर तसेच ग्रामीण भागात वाढत्या अत्याचाराच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत प्रशासन आणि पोलिसांनी अधिक कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला श्रद्धांजली म्हणून सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्याचा निर्णय महापौर रवी लांडगे यांनी घेतला.




















Join Our Whatsapp Group