पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील साई चौक परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

ही घटना रविवारी (दि.४ मे) रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास साई चौक येथील हॉटेल रोनक येथे घडली. याप्रकरणी अशिष जगनाथ वाळुंज (वय ३०, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अब्बास शेख (वय ३०, रा. हॉटेल रोनक समोर, साई चौक पिंपरी), मोहंमद शेख (वय २१, रा. हॉटेल रोनक समोर, साई चौक पिंपरी), पंकज भुमकर (वय ३०, बौद्ध नगर पिंपरी) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष वाळुंज आणि त्यांचा मित्र मनोज पुंड हे हॉटेल रोनकमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर वेटरने हॉटेल बंद झाल्याचे सांगितले. त्यावरून फिर्यादी आणि वेटर यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादातून आरोपी संतप्त झाले आणि त्यांनी फिर्यादींना हॉटेलबाहेर नेऊन मारहाण केली.

यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात झारा मारून गंभीर दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत रस्त्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. “कोणी मध्ये आले तर त्यालाही सोडणार नाही,” अशी धमकी आरोपींनी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तीन आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३५२, ११५(२), ३५(५) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.




















Join Our Whatsapp Group