पिंपरी (Pclive7.com):- मिसिंग लिंक मार्गावर सेल्फी अथवा फोटो काढण्यासाठी वाहन थांबवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महामार्ग पोलिसांनी नुकताच दिला होता. मात्र, या इशाऱ्यानंतर अवघ्या काही तासांत पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी मिसिंग लिंकवर थांबून फोटो काढल्याचे आणि तो सोशल मीडियावर शेअर केल्याचे समोर आल्याने आता महामार्ग पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिसिंग लिंक मार्गावर वाहनांचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटरपर्यंत असतो. त्यामुळे या मार्गावर वाहन थांबवणे धोकादायक असून, जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगत महामार्ग पोलिसांनी सामान्य वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली होती. काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याचाही इशारा देण्यात आला होता.

अशा परिस्थितीत महापौर रवी लांडगे यांनी मुंबईकडे जाताना मिसिंग लिंकवर फोटो काढला आणि तो फेसबुकवर पोस्ट केला. त्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महामार्ग पोलिसांना सवाल विचारण्यास सुरुवात केली. “सामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि व्हीआयपींसाठी वेगळा नियम का?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या मते, जर महामार्ग पोलिसांनी सर्वसामान्य वाहनचालकांवर कारवाई केली असेल, तर महापौरांच्या वाहनावरही तशीच कारवाई झाली का? त्यांना विशेष परवानगी देण्यात आली होती का? वाहन थांबवून फोटो काढण्यास मुभा कोणी दिली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील मिसिंग लिंकवर फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याची चर्चा आहे. त्यांच्या वाहनावरही कोणती कारवाई झाली का, याबाबत स्पष्टता नसल्याने महामार्ग पोलिसांच्या कारवाईत दुहेरी निकष लावले जात असल्याची टीका होत आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बहुचर्चित मिसिंग लिंकचे लोकार्पण करण्यात आले. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून उभारण्यात आलेला हा मार्ग आणि झुलता पूल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि वाहनचालक आकर्षित होत आहेत. मात्र, या आकर्षणातून अनेक जण वाहन थांबवून फोटो व सेल्फी काढत असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. यामुळेच महामार्ग पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाईचा इशारा दिला होता. आता त्याच नियमांची अंमलबजावणी व्हीआयपी व्यक्तींवरही होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group