पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरात लहान बाळ चोरण्याच्या संशयावरून एका महिलेला संतप्त नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होती. काही नागरिकांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी तिला अडवून चौकशी केली. यावेळी नागरिकांनी तिची झडती घेतली असता तिच्या बॅगमध्ये चाकू, गुंगीचे औषध आणि स्प्रे आढळून आला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी तिला पकडून तत्काळ पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

या महिलेकडून नेमके कोणत्या उद्देशाने हे साहित्य बाळगण्यात आले होते, ती खरंच बाळ चोरीच्या प्रयत्नात होती का, तसेच तिच्यासोबत आणखी काही साथीदार आहेत का, याचा तपास पिंपरी पोलीस करत आहेत. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group