पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असतानाही या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ३८ घरमालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. एप्रिल २०२६ दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.

शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या व्यक्तींचा, विशेषतः संशयित बांगलादेशी नागरिकांचा शोध घेणे तसेच सुरक्षेला बाधा पोहोचवणारे प्रकार रोखणे, या उद्देशाने दहशतवाद विरोधी शाखा (ATB) आणि स्थानिक तपास पथकांनी (ATC) संयुक्तपणे भाडेकरू पडताळणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान अनेक घरमालकांनी भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याचे उघड झाले.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ च्या कलम १६३ नुसार घरमालकांनी भाडेकरूंची संपूर्ण माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित घरमालकांवर भारतीय न्याय संहिता-२०२३ च्या कलम २२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची आवश्यक कागदपत्रे जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करून पडताळणी करून घ्यावी. तसेच परिसरात कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




















Join Our Whatsapp Group