
पिंपरी (Pclive7.com):- चाकणसह परिसरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध उपायोजना करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या भागातील अतिक्रमणांचा सर्वे करण्यात येत असून संबंधितांनी अनाधिकृत बांधकामे / अतिक्रमणे तातडीने काढून घेण्याचे आवाहन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. आगामी आठवड्याभरात या भागातील अनाधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाढत्या अतिक्रमानामुळे चाकण एमआयडीसीसह परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनधारक व नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या माध्यमातून या भागातील प्रस्तावित रस्ता रुंदीनुसार जागेवर मार्किंग करण्यात येणार आहे. आगामी आठवड्याभरात संबंधित अनाधिकृत बांधकामे / अतिक्रमणावर निष्कासणाची कारवाई करण्यात येणार असल्याने संबंधितांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी समांतर रस्त्यांचे जाळे विकसित करण्याच्या अनुषंगाने भर देण्यात येत आहे. काही रस्ते अरुंद असल्याने ते रुंद करण्याचे अनुषंगाने नवीन रस्त्यांची आखणी करण्यात येत आहे. पुणे नाशिक रस्ता, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता, नगरपालिका क्षेत्र व नवीन प्रस्तावित रस्त्यांच्या परिसरातील अस्तित्वातील नाले बुजवण्यात आले आहे, ते संबंधितांनी खुले करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधितांवर गुन्हा नोंदवणार..
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अतिक्रमण मुक्त रस्ते यावर भर देण्यात येत आहे. या भागातील अतिक्रमणांचा सर्वे करण्यात येणार असून संबंधित अनाधिकृत बांधकामे / अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात आलेली अतिक्रमणे तर संबंधितांनी पुन्हा केली तर संबंधितांवर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
