
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपाची १२६ पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’ कार्यकारिणी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी जाहीर केली. या कार्यकारणीत समावेश करण्यात आलेले माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी त्यांच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काही तासातच पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

तुषार हिंगे यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, “मी, तुषार रघुनाथ हिंगे कालच माझी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आज मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. आणि यापुढील काळात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्ष वाढीसाठी त्याच जोमाने काम करत राहीन, तरी आपण माझा राजीनामा स्वीकार करावा हि विनंती.”

बहुचर्चित पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपाची कार्यकारिणीची घोषणा (दि.२७) करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष , ८ सचिव यासह प्रकोष्ठ अध्यक्ष आणि सदस्य अशी १२६ पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’कार्यकारिणी जाहीर केली होती.

या कार्यकारिणीत पक्षाच्या सर्व घटकांना आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काटे केला होता. मात्र अवघ्या २४ तासांच्या आत शहर भाजपाच्या या कार्यकारणीला तुषार हिंगे यांच्या रूपाने भगदाड पडल्याचे बोलले जात आहे. तुषार हिंगे यांच्या राजीनामामुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

सर्व समावेशक शहर कार्यकारिणी करण्याचे मोठे आव्हान शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना होते. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहर भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर आल्यामुळे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे. आता शत्रुघ्न काटे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून कशाप्रकारे हे नाराजी नाट्य मिटवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






















Join Our Whatsapp Group