पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी उभारलेल्या एअर प्युरिफिकेशन फाउंटन सिस्टीमवरील लोखंडी पाईप गंजून तुटलेले व लटकलेले असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत दिपक खैरनार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत (NCAP) दिल्ली शहराच्या धर्तीवर शहरातील दूषित हवा शुद्ध करण्यासाठी १७ प्रमुख चौकांमध्ये एअर प्युरिफिकेशन फाउंटन सिस्टीम उभारण्याची संकल्पना राबविली. या यंत्राद्वारे पाण्याचे तुषार हवेत सोडून हवेतील प्रदूषण कमी करणे, तसेच नागरिकांना स्वच्छ व शुद्ध हवा मिळावी हा उद्देश होता.

परंतु सध्या आकुर्डी खंडोबा माळ चौक, चिंचवड, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पिंपरी), नाशिक फाटा चौक आदी ठिकाणी उभारलेल्या एअर प्युरिफिकेशन फाउंटन सिस्टीमवरील लोखंडी पाईप गंजून तुटलेले असून काही ठिकाणी लटकलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे या चौकातून जाणाऱ्या वाहनचालक व पादचाऱ्यांच्या अंगावर किंवा वाहनावर पाईप पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरील यंत्रणा शहरातील हवा शुद्ध करण्यासाठी उभारण्यात आली असली, तरी त्यातील लोखंडी पाईप गंजून धोकादायक अवस्थेत आल्यामुळे ही संकल्पना अपूर्ण व नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.

तात्काळ सदर ठिकाणी तपासणी करून गंजलेले व तुटके लोखंडी पाईप बदलून द्यावेत. तसेच सर्व १७ चौकांतील एअर प्युरिफिकेशन फाउंटन सिस्टीमची तांत्रिक तपासणी करून सुरक्षित स्थितीत आणावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्ती यंत्रणा सक्षम व नियमित कार्यान्वित करावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय अतिशय गंभीर असल्याने त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group