देहूरोड (Pclive7.com):- मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील मामुर्डी गणपती मंदिराजवळ आज सकाळी साडेपाच वाजता भरधाव मारुती स्विफ्ट (MH 14 EH 7503) गाडीचा भीषण अपघात झाला. गाडीचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला आदळले असून, या अपघातात गाडीची डावी बाजू, समोरील इंजिन व वरचा भाग पूर्णपणे चकनाचूर झाला.

या धडकेत गाडीच्या डाव्या बाजूस असलेले सिद्धांत आनंद आणि दिव्यराज राठोड (वय 22) हे दोघे जागीच ठार झाले. तर चालकासह इतर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पुढील सीटवरील एका प्रवाशाला वाहनातून बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले.

अपघाताची माहिती मिळताच प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र आणि पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी गौतम इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली जवान मिलिंद पाटील, दीपक ढवळे, नितीन कोकरे, भूषण येवले, शुभम किर्वे, प्रशांत काठोळे, अर्जुन चव्हाण आदींनी मदतकार्य केले.

या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group