पिंपरी (Pclive7.com):- चिखलीमधील एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी ऑडी कारमधून आलेल्या रावण टोळीचा डाव पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने उधळून लावला. याप्रकरणी सहा जणांना अटक केली असून, तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पिस्तूल, कोयता अशा घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी (दि.१७) सकाळी नऊ वाजता करण्यात आली.

अनिरुद्ध ऊर्फ बाळ्या ऊर्फ विकी राजू जाधव (२८, रा. रावेत), अभिषेक ऊर्फ बकासुर चिमाजी पवार (२२, रा. चिंचवड), यश ऊर्फ गोंद्या आकाश खंडागळे (२१, रा. निगडी), शुभम गोरखनाथ चव्हाण (३०, रा. आकुर्डी), प्रद्युम्न राजकुमार जवळगे (२५, रा. चाकण), सोहन राजू चंदेलिया (२३, रा. रावेत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील पाटीलनगर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीने आरोपी आले होते. स्विफ्ट आणि ऑडी कारमधून आरोपी दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावला. दोघेजण कारच्या बाहेर थांबून पाहणी करत होते. तर, इतर सातजण कारमध्ये बसून होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन कार, पिस्टल, जिवंत काडतूस, कोयता, गुप्ती, मिरची पूड, बांबू, रस्सी असा एकूण १५ लाख २५ हजार ९७४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने, पोलिस उपनिरीक्षक समीर लोंढे, पी. पी. तापकीर, सहायक उपनिरीक्षक एस. एन. ठोकळ, व्ही. एच. जगदाळे, ए. पी. गायकवाड, जी. डी. चव्हाण, एस. डी. चौधरी, व्ही. टी. गंभीरे, जी. एस. मेदगे, एस. पी. बाबा, एन. बी. गेंगजे, व्ही. डी. तेलेवार, एम. एस. दळवी, आर. के. मोहिते, व्ही. एन. वेळापुरे, एस. पी. घारे, डी. व्ही. गिरी, एस. टी. कदम, टी. ई. शेख यांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group