पिंपरी (Pclive7.com):- वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचा संदेश देणारा भव्य ‘रिव्हर सायक्लोथॉन’ उपक्रम यंदा मोशी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. निलेश लोंढे यांनी दिली.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन आणि नदी स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रतिवर्षी ‘रिव्हर सायक्लोथॉन’चे भोसरी येथील गावजत्रा मैदानावर आयोजित केले जाते. मात्र, सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमींचा वाढता प्रतिसाद पाहता यंदा अधिक प्रशस्त आणि सुव्यवस्थित ठिकाण निवडण्यात आले आहे. स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, मोशी येथे होणार आहे. पुणे–नाशिक महामार्गाजवळील हे ठिकाण मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या सायकलस्वारांसाठी सोयीस्कर आहे.

सदर सायक्लोथॉन रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता मोशी येथून सुरू होईल. यंदा तब्बल ३५ हजाराहून अधिक सायकलस्वार सहभागी होणार आहेत. पर्यावरण, आरोग्य आणि भावी पिढ्यांच्या संरक्षणासाठी समाजातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचा उद्देश आहे. उपक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, WTE फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे. मुख्य संदेश “एक पाऊल भावी पिढीसाठी” ह्या ब्रीदवाक्याखाली पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य जागृतीला प्राधान्य देणे आहे.
“उत्साह तर नेहमीचा आहे, फक्त ठिकाण नवे! मोशीतील स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण येथे आयोजित ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ मध्ये प्रत्येक सायकलस्वाराचा उत्साह आणि ऊर्जा आम्हाला पहायला मिळणार आहे. पर्यावरणाच्या संदेशासाठी, इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी आणि भावी पिढ्यांसाठी या उपक्रमात पर्यावरण प्रेमी, अबालवृद्धांनी सहभागी व्हावे. या ठिकाणी प्रशस्त पार्किंग आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. वसुंधरा संवर्धनाचा जागर या निमित्ताने करुन विक्रमी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करीत आहोत.
– डॉ. निलेश लोंढे, मुख्य समन्वयक.
























Join Our Whatsapp Group