पिंपरी (Pclive7.com):- घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याजवळील जंगल भागात गहुंजे स्टेडियमच्या जवळ बुधवारी (दि.१९) सकाळी तरसाचे दर्शन झाले. मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना झाडीतून हालचाल जाणवल्यानंतर त्यांनी निरखून पाहिले असता, तरस दिसून आला. काही क्षणातच तो पुन्हा जंगलात निघून गेला.

या घटनेनंतर भीतीचे स्थानिकांत वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी वनविभागाने तत्काळ माहिती देऊन नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. याविषयी वनरक्षक योगेश कोकाटे यांनी सांगितले की, “तरसापासून मनुष्याला कुठलाही प्रकारचा धोका नसून उलट तरस हे ‘स्वच्छतादूत’ म्हणून काम करतात. परिसरात दुर्गंधीयुक्त तसेच मेलेले प्राणी खाऊन ते नैसर्गिक स्वच्छता करतात. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरू नये.”

वन अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, तरस मनुष्यांवर हल्ला करत नाही. तो सहसा जंगलातील शांत ठिकाण पसंत करतो. तरीही सावधगिरी म्हणून रात्रीच्या वेळी एकट्याने जंगल भागात न जाणे आणि जनावरे सुरक्षित अंतरावर बांधणे, अशी सूचना त्यांनी केली. घोराडेश्वर डोंगर परिसर जैवविविधतेने समृद्ध असून येथे तरसासह मोर, कोल्हे, ससे व विविध वन्यप्राणी आढळतात. तरसाचे दर्शन हा पर्यावरण संतुलनासाठी सकारात्मक संकेत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.























Join Our Whatsapp Group