पुणे (Pclive7.com):- रायगडच्या ताम्हिणी घाटात थार अपघातातील सहा तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व तरुण 21 ते 24 वयोगटातील होते. अजूनही या तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेकडून मृतदेह बाहेर काढले जात असून पोलीस देखील या बचाव कार्यात योग्य ती मदत करत असून थार कार मधील सर्व 6 तरुणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. हे सर्व तरुण पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा महत्वाचा दुवा समजला जातो, मात्र या घाटात वारंवार अपघात होण्याच्या घटना होत असतात. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील 6 तरुण आपल्या नवीन थार घेऊन कोकणात फिरण्यासाठी निघाले. मात्र मंगळवारी पहाटे या तरुणांची ही थार कार घाटातील एका 500 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली.
पोलिसांना अपघाताची माहिती कशी मिळाली?
फिरायला गेलेले सर्व तरुण सोमवारी रात्री उशिरा पुण्यातून थार कारने निघाले होते. मंगळवारी सकाळपासून त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे काही तरुणांच्या पालकांनी पोलिसांना फोन लावला. पोरांनी कोकणात जाण्याआधीच एका हॉटेलमध्ये रूम बूक केलेली होती. पण पोरं वेळेत न आल्यामुळं हॉटेलच्या मालकाने रूम बुक केलेल्या तरूणाच्या नंबर दिलेल्या मित्राला फोन केला अन् अजूनही ते आले नाहीत, याची माहिती दिली. त्यानंतर तरूणांची शोधाशोध सुरू झाली. पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्या मोबाइल फोनचे लोकेशन ताम्हिणी घाटात असल्याचे शोधून काढलं, आणि तपासाला सुरूवात झाली.

काल (गुरुवारी, दि. 20) सकाळी माणगाव पोलिसांनी तरूणांची शोधमोहीम सुरू केली. सीसीटीव्ही तसेच तरुणांच्या मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून तपास करताना पोलिस ताम्हिणी घाट परिसरापर्यंत त्यांचं लोकेशन आढळून आलं. गुरुवारी पोलिसांनी फोनच्या लोकेशन आधारे ताम्हिणी घाटामधील अवघड वळणावर असलेल्या अपघातप्रवण ठिकाणी ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. खोल दरीमध्ये गाडी आणि चार मृतदेह पडल्याचे ड्रोनच्या माध्यमातून दिसून आले. त्यावेळी सर्वांना मोठा धक्का बसला. मात्र, गाडी व मृतदेह हे खूप खोल दरीमध्ये असल्यामुळे शोधकार्य खूपच कठीण झालं होतं.
साहिल हा गरिबीशी झुंज देऊन स्वतःची ‘थार’ घेणारा आणि पुण्यात 3-4 ठिकाणी ‘मोमोज’चा व्यवसाय उभा करणारा मेहनती तरुण म्हणून परिसरात ओळखला जायचा. आपल्या जिवलग मित्रांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण फिरायला निघाला होता. अवघ्या 20 दिवसांपूर्वी साहिलने नवीन कोरी थार कार घेतली. साहिल आवडीने आपली कार घेऊन आपल्या मित्रांसमवेत कोकण दाखवण्यासाठी निघाला आणि वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात घडला. या अपघातामध्ये सहाही तरुणांचा मृत्यू झाला. सध्या 4 जणांचे मृतदेह रेस्क्यू करणाऱ्या टीमच्या हाती लागलेत उर्वरित दोघांचा शोध अजूनही सुरू आहे.
अपघातातील तरुणांची नावे
1) साहिल गोठे (वय 24)
2) शिवा माने (वय 20)
3) प्रथम चव्हाण (वय 23)
4) श्री कोळी (वय 19)
5) ओमकार कोळी (वय 20)
6) पुनीत शेट्टी (वय 21)
दरम्यान, पुणे पोलिसांनी माणगाव पोलिस, रायगड आपत्ती व्यवस्थापन, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सहाजणांची बॉडी सापडल्याची माहिती मिळतीये. कोसळलेल्या थार कारच्या वेगात लोखंडी बॅरिगेट्स आणि येथील लोखंडी खांबाचे तुकडे होऊन पडलेत त्यामुळे या कारचा वेग प्रचंड असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.