
सत्ताधारी-विरोधक दोघंही मूग गिळून गप्प; आपापसात साटंलोटं असल्याची चर्चा
पिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडल्याची चर्चा आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाच्या जागेसाठी चक्क लिलाव झाल्याचं बोललं जात आहे. एका प्रभागात पुरुषांच्या जागेसाठी १ कोटी तीन लाखांची बोली लागली अन् महिलांच्या जागेसाठी २२ लाखांची बोली लागली. अशी चर्चा राजगुरुनगरमध्ये जोरदार सुरु आहे.

मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही ही मूग गिळून गप्प आहेत. आपापसात साटेलोटे झाल्यानं, ‘तेरी भी चूप ओर मेरी भी चूप’ अशी भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा आहे. बोलीतील रकमेतून शहराचा विकास करायचं असं ही एकमुखी निर्णय झाल्याचं बोललं जात आहे. पण हे कोणत्या प्रभागात घडलं आऐ ते उमेदवार कोण? याबाबतची वाच्यता कोणीचं करत नाहीये.

आज बिनविरोध घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अशात कोण-कोण माघार घेतंय आणि जे माघार घेतात त्याच्या प्रभागात ही बोली लागली का? याबाबत तर्क-वितर्क लावले जाणार हे उघड आहे. मात्र नगरसेवक पदासाठी पाच लाखाच्या आसपास खर्चाची मर्यादा आहे, अशात जर पुरुषांच्या जागेसाठी १ कोटी ३ लाख आणि महिलांच्या जागेसाठी २२ लाखांची बोली लागली असेल तर मग राज्य निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेणार? कारण भविष्यात निवडणुकांमधील पदांसाठी असा लिलाव होऊ लागला तर ही नवी प्रथा पडण्याची भीती आहे.






















Join Our Whatsapp Group