
पिंपरी (Pclive7.com):- कासारवाडी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या (१९८६-८७) माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी (१६ नोव्हेंबर) पिंपरीतील श्रीकृष्ण पॅलेस येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने जवळपास ३८ वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले. भूतकाळातील गोड आठवणींना उजाळा देत आनंददायी क्षणांचा मनमुराद आनंद लुटण्यात आला. परस्परांच्या सुख–दुःखात सहभागी होणे, एकमेकांना मदत करणे आणि सामाजिक सलोखा वाढविणे, हा अशाप्रकारे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश होता.

प्रारंभी ,दिवंगत झालेले माजी विद्यार्थी मित्र दीपक राऊत, बाळासाहेब नेवाळे, राजेश कांबळे, राजेंद्र प्रसाद, हेमलता कोळी, सावता बुणगे, संतोष बनकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर, १९८६-८७ या वर्षात प्रथम क्रमांक मिळविलेल्या सरोजिनी जाडर हिचा स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांनी कराओके गीतानंदात रममाण होत विविध मराठी–हिंदी गाणी सादर केली. सुधाकर पाढळकर, प्रकाश कानडे, गणेश पठारे, रेखा चव्हाण, शर्मिला साळवी आणि हेमंत लांडे यांनी श्रवणीय गाणी सादर केली. कार्यक्रमासाठी शैलेश घावटे यांनी ध्वनीव्यवस्था सांभाळली, तर दिनेश जोशी यांनी शालेय जीवनातील गमतीदार किस्स्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. संगीत आणि नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत शिंदे यांनी केले. चिमण लांडगे, प्रकाश कानडे, रवींद्र चेडे, अविनाश जासूद, सुनील शेटे, वैशाली गुळवणी, मालती धुमाळ, संगीता गोरडे, रोहिणी वाघमारे, संगीता चव्हाण,मंगल बाजारे ,अशोक कोंढावळे, उर्मिला व्यास, सुनीता कोले या माजी विद्यार्थ्यांनी मनोगतांमधून शालेय आठवणींना उजाळा दिला.
यावेळी बोलताना शिक्षक नवनाथ बोऱ्हाडे म्हणाले की, शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो. आईवडील हेच पहिले व सर्वोच्च गुरू आहेत. अंतरात्म्याचा कौल घेऊन सदाचाराने वागल्यास जीवनात यश निश्चित मिळते. या कार्यक्रमाचे संयोजन घमाजी लांडगे, रवींद्र लांडगे, सोमनाथ शिंदे, अनिल बांगर, संदीपराजे शिर्के, दीपक परदेशी, राजेंद्र शिवशरण, दिनेश जोशी, सुनील बोरकर, प्रवीण लांडे यांनी उत्साहाने पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत शिंदे यांनी केले. अनिल बांगर यांनी आभार मानले.






















Join Our Whatsapp Group