
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला पवना नदीतून पाणी उचलून पाणीपुरवठा केला जातो, मात्र हीच नदी आला प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. थेरगाव येथील केजुबाई बंधारा येथे पवना नदी आज (दि.२१) पुन्हा फेसाळली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकतेच पवना नदी प्रदूषणाबाबत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना केल्या होत्या. मात्र खासदारांच्या सूचनेकडे प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

थेरगाव बोट क्लब येथील केजुबाई बंधाऱ्याजवळ पवना नदी मोठ्या प्रमाणावरती फेसाळली आहे. पवना नदी या ठिकाणी फेसाळण्याची ही पहिलीच घटना नसून या आधी देखील नदीपासून काही अंतरावरून असलेल्या कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी नदीपात्रात सोडल्याने हा फेस तयार होत असल्याने निर्दशनास आले होते, त्यांवर कारवाई देखील झाली होती. मात्र पुन्हा जैसे थे..ची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रदूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जलचरांचे जीवनमान धोक्यात आल्याने आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा पर्यावरण विभाग या कंपन्यांवर काय कारवाई करतो हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्या सूचनेनंतर ही प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना नाही..
खासदार श्रीरंग बारणे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शहरातील नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असून ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदीच्या पात्रात राडारोडा टाकला जात आहे. मैलामिश्रित पाणी थेटपणे नदीत सोडले जात आहे. नदी सुधारवर कोट्यवधी रुपये खर्च करुनही नदीची दयनीय अवस्था आहे. प्रशासन केवळ निविदा काढण्यात दंग आहे. वाढत्या प्रदुषणाचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. श्वसनाचे विकार जडत आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना खासदार बारणे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या.





















Join Our Whatsapp Group