
पिंपरी (Pclive7.com):- गणेश उत्सवादरम्यान विसर्जन मिरवणुकीत बीम लाईट, लेझरचा वापर केल्याबद्दल पिंपळे गुरव येथील वैदू वस्ती परिसरातील भैरवनाथ मित्रमंडळाच्या अध्यक्षाला २ दिवसांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. गोपी पंढरीनाथ लोखंडे असे शिक्षा झालेल्या अध्यक्षाचे नाव आहे. त्याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार, गणेशोत्सव काळात परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व सभासद यांची बैठक घेतली होती. मंडळांकडून पालन करण्यात येणारी नियमावली, सूचना पोलिसांनी जाहीर केली होती. मात्र या सूचनांचे पालन न करता भैरवनाथ तरुण मंडळाने ४ सप्टेंबर २०२५ च्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डोळ्यांना इजा होईल अशी लेझर व बिम लाइट वापरली होती. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने ५ सप्टेंबरला या मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेतील दोषापत्रानुसार आरोपीला पिंपरी न्यायालयात हजर केले असता प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी १ हजार रुपये दंड व दोन दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सण-उत्सव काळात मंडळांनी, नागरिकांनी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदिप आटोळे यांनी सांगितले.























Join Our Whatsapp Group