मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे प्रभाग १४ मध्ये भाजपा उमेदवारांचे पारडे जड
पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. “जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले. योजनेबाबत पुढील टप्प्याची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, आता केवळ आर्थिक मदतीपुरतेच न थांबता, लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प सरकारने केला आहे. महिलांना स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आकुर्डी येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहरात आले होते, यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची ठरत असून, यामुळे लाखो महिलांना थेट लाभ झाला आहे. आता या योजनेच्या माध्यमातून महिलांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लाडकी बहीण योजना अधिक व्यापक स्वरूपात पुढे जाण्याचे संकेत मिळाले आहेत.
एसआरए प्रकरणावर महेश लांडगे यांचा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) संदर्भात सुरू असलेल्या घडामोडींवर आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. काही स्थानिक नेत्यांना माज चढला असून ते स्वतःला एसआरएचा ‘बाप’ समजत असल्याचा आरोप त्यांनी केला. महेश लांडगे म्हणाले की, “काही लोक एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली नागरिकांना सरळ धमक्या देत आहेत. जणू काही हे प्रकल्प त्यांच्या स्वतःच्या जागेवर उभारले जात आहेत, अशा थाटात त्यांची वर्तणूक आहे.” या सगळ्यामागे इथलाच एक नेता असून, त्याला आपण एसआरएचा सर्वेसर्वा असल्याचा गैरसमज झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
“तो जे काही करत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. स्वतःला बाप समजणाऱ्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे,” असे म्हणत लांडगे यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच, एसआरए प्रकल्पात घुसखोरी करणाऱ्यांना प्रचंड माज आला असून, अशा लोकांवर कडक कारवाईची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एसआरए संदर्भातील धमक्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) संदर्भात सुरू असलेल्या धमकवण्याच्या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली. महेश लांडगे यांनी भाषणात “एसआरएच्या कामासाठी कोणीतरी धमकी देत आहे” असा उल्लेख केल्यानंतर, त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी थेट शब्दांत इशारा दिला. “इथे कुणीही काळजी करू नये. या राज्यात धमकीचं नाही तर कायद्याचं राज्य चालतं,” असे ठामपणे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, धमकी देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम आहे. “त्यासाठी मला मध्ये बोलायची गरज नाही, आमचे पोलीस ते काम करतील,” असेही ते म्हणाले.
एसआरए संदर्भात महत्त्वाचा खुलासा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुळात एसआरएचा मुख्य अध्यक्ष मीच आहे.” त्यामुळे या प्रकरणात योग्य ती कारवाई जनतेच्या हिताचा विचार करूनच केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, “जनतेच्या हितासाठी जी काही कारवाई करायची आहे, ती १६ जानेवारीनंतर करण्यात येईल,” असे सांगत त्यांनी स्पष्ट संकेत दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे एसआरए प्रकरणात गैरप्रकार करणाऱ्यांना धडकी भरली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे प्रभाग १४ मध्ये भाजपा उमेदवारांचे पारडे जड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मोहन नगर, आकुर्डी, काळभोर नगर प्रभाग क्रमांक १४ मधील भाजपा उमेदवार मीनलताई यादव, ऐश्वर्याताई बाबर, कैलास कुटे, प्रसाद शेट्टी यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेमुळे संपूर्ण प्रभाग भाजपामय झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी शहराचा केलेला सर्वांगीण विकास आणि पुढील काळात शहराचा कायापालट करणार असा विश्वास मतदारांना दिला आहे. विशेषत: लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, आता केवळ आर्थिक मदतीपुरतेच न थांबता, लाडक्या बहिणींना ‘लखपती दीदी’ बनवण्याचा संकल्प सरकारने केला असल्याची ग्वाही दिल्यामुळे प्रभागातील महिलांची शक्ती आता भाजपा उमेदवारांच्या पाठीशी राहणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






















Join Our Whatsapp Group