पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर- काळभोर नगर, आकुर्डी परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. दूषित पाण्यामुळे अनेक नागरिक आजारी पडले असून काहींना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याने तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेविका मिनल यादव यांनी केली आहे.

मोहननगर- काळभोर नगर, आकुर्डी परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घसा दुखणे, पोटदुखी, जुलाब यासारख्या तक्रारी वाढल्या असून लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा विशेष परिणाम होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका मिनल यादव यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. परिसरातील पाणीपुरवठा तातडीने तपासून स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करावा, तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवून अहवाल जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, आयुक्त सध्या नागपूर येथे असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित तोडगा काढण्याचे आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती माजी नगरसेविकांनी दिली. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मिनल यादव यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group