पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक ११ घरकुल-चिखली परिसरातील पूर्णानगर, कृष्णानगर, शरदनगर, फुलेनगर भागात भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढल्याची तक्रार समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती जाधव यांनी आज (दि.१७) पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, घरकुल-चिखली परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी एमआयडीसीमधून घरी परतणाऱ्या कामगारांनाही कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आणि हल्ल्याच्या भीतीमुळे धास्ती वाटत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच चाकण परिसरात नुकत्याच घडलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील महिलेच्या मृत्यूच्या घटनेचा संदर्भ देत, अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित भागातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ न केल्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मारुती जाधव यांनी दिला आहे. या निवेदनामुळे महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






















Join Our Whatsapp Group