पिंपरी (Pclive7.com):- शहरातील पाणी टंचाईस राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. राष्ट्रवादीने त्यांच्या सत्ताकाळात पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजन केले नाही. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचाही त्यांनी फज्जा उडविला. त्यामुळे शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यावर उपाययोजना म्हणून भाजपाने भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातील पाणी आरक्षणासाठी पाठपुरावा केला. त्यात यश आले असून पाणी आरक्षणास मंजुरी मिळाली. ही बाब राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांना खटकत असल्याने त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत, असा टोला एकनाथ पवार यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासकामांचे श्रेय घेत भाजपा पदाधिकारी ढोलकी वाजवित आहेत, असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेता दत्ता साने केला होता. त्याला प्रतित्युर देत पक्षनेते एकनाथ पवार यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात एकनाथ पवार यांनी नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून 48.576 दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून 60.79 दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून 38.87 दशलक्ष घनमीटर असा एकूण 148.236 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास शासनाच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली. या आरक्षणास मंजुरी करून घेण्यासाठी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या माध्यमातून भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला. त्याला यश आले असून शहरासाठी पाणी आरक्षित झाले आहे.
तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी पाण्याचे राजकारण केले. भामा -आसखेड आणि आंद्रा धरणातील पाणी आरक्षित करूनही त्यांनी पुर्नस्थापना रक्कम राष्ट्रवादीच्या तत्कालीन सत्ताधा-यांना भरू दिली नाही. महापालिका प्रशासनावर दबाव आणून संबंधित रक्कम अदा करण्याच्या कामात विलंब केला. परिणामी पाण्याचे आरक्षण रद्द झाले. असे असतानाही महापालिकेतील विरोधी पक्षनेता दत्ता साने भाजपावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यांच्या सत्ताकाळातच पाणी आरक्षणासाठीची रक्कम संबंधित विभागाकडे वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या नाकर्तेपणामुळे आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय स्वार्थामुळे शहरवासीयांच्या हक्काचे पाणी पळविण्याचा डाव आखण्यात आला होता. मात्र भाजपाने ही खेळी वेळीच ओळखली आणि शहरसाठीचे आरक्षित पाणी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यशही आले आहे. नेमकी हीच बाब खटकत असल्याने विरोधी पक्षनेता दत्ता साने यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत.
विकासकामे करताना राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले. त्याचा भुर्दंड शहरवासीयांना बसला आहे. त्यामुळेच मतदारांनी राष्ट्रवादीला सत्तेतून पायउतार केले. असे असले तरी राष्ट्रवादीची सत्तेची हवा गेलेली नाही. सत्तेत असल्याचा आणि आपण सत्ताधारी असल्याचा भास त्यांना आजही होत आहे. विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची त्यांची मानसिकता नाही. त्या मानसिकतेतून ते बेछूट आणि निरर्थक बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असे एकनाथ पवार यांनी पत्रकात नमूद केले आहे.






















Join Our Whatsapp Group