पिंपळे गुरव (Pclive7.com):- शहरात तापमान वाढत असताना पिंपळे गुरव परिसरातील रामनगर ते सीएमई सैन्य दलाच्या सीमेलगत जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे जळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्लू डार्ट ते मयुर नगरी चौक दरम्यानच्या फूटपाथवर ५ ते १५ फूट उंचीपर्यंत वाढ झालेली सुमारे २५ झाडे पाण्याअभावी कोमेजून जळून गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महापालिकेकडून शहरात ३२ लाख झाडे असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात वाढलेली झाडेच जगवता येत नसल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. यामुळे “झाडे लावा, झाडे जगवा” हा शासनाचा संदेश केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहिला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. फूटपाथ विकसित करताना झाडांच्या बुंध्याभोवती सिमेंटचे आवरण दिल्याने मुळांना वाढण्यासाठी जागा मिळत नाही, तसेच पाणी व मातीची कमतरता निर्माण होते. परिणामी झाडे कोमेजून जळण्याच्या घटना वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी प्रशासनावर टीका करत, “आजचे वृक्षारोपण व संरक्षण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी ऑक्सिजनची हमी आहे; मात्र प्रत्यक्षात झाडांची अशी अवस्था होत असेल तर हे दुर्दैवी आहे,” असे म्हटले. त्यांनी उद्यान विभागाने तातडीने लक्ष देऊन झाडे वाचवावीत, अशी मागणी केली.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे वृक्षमित्र अरुण पवार यांनी झाडांना टँकरद्वारे पाणी देण्याचे आश्वासन दिले असून गरज पडल्यास तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड यांनीही कामचुकार अधिकारी व ठेकेदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “अधिकारी फक्त आश्वासन देतात, प्रत्यक्षात कारवाई होत नाही,” अशी टीका केली.
या निवेदनावर अण्णा जोगदंड, संजना करंजावणे, काळुराम लांडगे, संगीता जोगदंड, गजानन गजानन, मुरलीधर दळवी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते अरविंद मांगले, जालिंदर दाते, संजय कांबळे, गणेश वाडेकर, पंडित वनस्कर, रितेश वनस्कर, महेश राऊत आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group