पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या “ज्येष्ठानुबंध” उपक्रमांतर्गत आता त्यांच्या वाढदिवसाचे विशेष सेलिब्रेशन करून अनोख्या पद्धतीने सन्मान केला जात आहे. या उपक्रमाला शहरातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून “ज्येष्ठानुबंध” हा ॲप विकसित करण्यात आला आहे. या ॲपच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पोलिस सेवा तसेच इतर आवश्यक मदत सहज उपलब्ध करून दिली जाते. आतापर्यंत शहरातील २८ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी या ॲपवर नोंदणी केली आहे.
या उपक्रमांतर्गत पोलिस अधिकारी आणि कर्मचारी दररोज काही ज्येष्ठ नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतात. याचबरोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे. अलीकडेच पोलिस आयुक्तालय हद्दीतील काही ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन साजरे केले.

या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक श्रीमती सुशीला कपालदास गुलार्णी, वय ६१ वर्षे, रा. नवताजधाम वृध्दाश्रम, अंबी, ता. मावळ, श्रीमती पद्मा किशोर सरपोद्दार, ७७ वर्षे, रा. कुलदीप रेसीडन्सी, फ्लॅट नं.०१, सेक्टर नं.१, वैष्णोमाता मंदिराजवळ, इंद्रायणीनगर, भोसरी, श्री. नयन रमाकांत पानसरे, वय ७४ वर्षे, रा. ब्ल्युरिज राजीव गाधी इन्फोटेक पार्क, फेज १, हिंजवडी यांची समक्ष भेट घेवुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे वाढदिवस साजरे केले आहेत. यावेळी संबंधित जेष्ठ नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत या उपक्रमाचे कौतुक केले.
“ज्येष्ठानुबंध” उपक्रमाला शहरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी या ॲपचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group