पिंपरी (Pclive7.com):- तब्बल २२ लाख रुपये खर्चून स्पेनच्या बार्सिलोनामध्ये स्मार्ट सिटीच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तांसह इतर पदाधिकाऱ्यांवर सुरुवातीपासूनच टीका होत होती. आता ही टीका आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याला कारण आहे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह इतर अधिकारी पदाधिकाऱ्यांबरोबर काढलेला सेल्फी…! या सेल्फीत आयुक्त स्वतः मोबाईलवर सेल्फी काढताना दिसत आहेत. आधीच अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली सहल काढल्याची टीका होत असल्यामुळे त्यात हा फोटो व्हायरल झाल्याने या दौऱ्यावर अधिक टीका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बार्सिलोना शहरात स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेसच्या वतीने स्मार्ट सिटी एक्प्रो काँग्रेस २०१८ या परिषदेचे १३ ते १५ नोव्हेंबर या कालावधी आयोजन केले आहे. या परिषदेत आणि अभ्यासदौर्यात सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेचे सचिन चिखले, शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे, महापालिका आयुक्त व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता राजन पाटील सहभागी झाले आहेत. तसेच भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे देखील स्वखर्चाने या दौऱ्याला गेले असल्याचे समजते.
दरम्यान, या परदेश दौर्यास माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी विरोध दर्शविला आहे. अभ्यासदौर्याच्या नावाखाली पर्यटन व सहल केली जात असून, त्याद्वारे करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सत्ताधारी भाजप एकीकडे आर्थिक बचतीचा दावा करीत काटकसरीचे धोरण राबवित आहे. तर, दुसरीकडे या प्रकारे उधळपट्टी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वास्तविक पाहता आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर सुरूवातीपासून ते भाजप धार्जिण असल्याचा आरोप होत आहे. ते भाजपाचे प्रवक्ते असल्याची ओरडही विरोधकांनी यापूर्वी केली आहे. आता आयुक्तांनी भाजप आमदारांसोबत काढलेला हा स्मार्ट सेल्फी त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो.