पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंधरा दिवसांत शास्तीची धास्ती घालविण्याच्या घोषणेच्या काऊंटडाऊनचा फलक महापालिकेने सोमवारी (दि.२१) हटविल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यांनी आज पुन्हा नव्याने मुख्यमंत्री फडणवीस यांचा फ्लेक्स तयार करून, त्याला गाजराचा हार घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आता तरी भाजपने गाजरांच्या आश्वासनांची शेती बंद करावी, अशी उपरोधिक मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीबाबत दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी विरोधकांनी महापालिका मुख्यालयासमोर लावलेला काऊंट डाऊन फलक महापालिका प्रशासनाने सोमवारी (दि.२१) हटविला. विरोधकांनी याला आक्षेप घेतला. या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दर्शनी भागात हा फलक लावण्यात आला होता. येत्या २४ जानेवारीला या आश्वासनाची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर हा फलक काढून टाकल्याने विरोधक चांगलेच संतापले होते. याप्रकरणी सत्ताधारी भाजपला जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले होते.
यावेळी संजोग वाघेरे यांनी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाना साधला. सर्वसामान्यांची दिशाभूल करून, वारेमाप आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने पिंपरी चिंचवडकरांची घोर फसवणूक केली आहे. हे सरकार सर्वसामान्यांच्या भावनेशी खेळत आहे. आश्वासनांची खैरात केली जात आहे. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेले शास्ती माफीचे आश्वासन त्यांचा चांगलेच महागात पडले आहे.
या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विशाल वाकडकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, मारुती भापकर, समाजवादीचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी, रिपाइं वाहतूक आघाडीचे अजिज शेख, शेकापचे हरिष मोरे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, वैभव जाधव, छावाचे धनाजी येळकर, मनसेचे रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, राष्ट्रवादी युवतीच्या वर्षा जगताप, संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब आडागळे यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत शास्तीचा विषयच नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ९ जानेवारीला झालेल्या पिंपरी चिंचवड दौऱ्यादरम्यान शास्तीबाबत १५ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १५ आणि काल (दि.२२) झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शास्तीचा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, या दोन्ही बैठकांमध्ये शास्तीबाबत निर्णय होउ शकला नाही. त्यामुळे शास्तीचे आश्वासनच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप तोंडघशी पडले आहेत. येत्या गुरुवारी (दि.२४) या आश्वासनपूर्तीचा शेवटचा दिवस आहे.
























Join Our Whatsapp Group