पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी मी गेल्या वर्षी तीव्र इच्छुक होतो. त्यावेळी उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यावेळेस पक्षाने मला संधी दिली होती. माझ्या सभापतीपदासाठी पक्षातील सर्वांनी ‘हिरवा कंदील’ दिला होता. परंतू अचानक काय झाले कळाले नाही. प्रत्येक वर्षी एकाला स्थायीत काम करण्याची संधी देण्याचा पक्षाने निर्णय घेतला होता. माझ्यावरती अन्याय झालायं, मी भाजपच्या विचारधारेणी काम करतो. मी पक्षाचा एकनिष्ठ आहे, मला कोअर कमिटी न्याय देईल असा आत्मविश्वास नगरसेवक शीतल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी मात्र आपली ‘बंडखोरी’ कायम ठेवणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पक्ष माझा विचार करेल, पुढे काय करायचं ते त्या दिवशी बघू असं सांगत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्यामुळे शिंदे यांनी पुकारलेले ‘बंड’ आता ‘थंड’ होणार की काय..? असा सवाल उपस्थित झाला आहे.
स्थायी समितीच्या सभापतीपदी सत्ताधारी भाजपाने ऐनवेळी शीतल शिंदे यांचा पत्ता कट करत विलास मडेगिरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सलग दुसऱ्यावर्षी डावलल्याने आक्रमक झालेल्या शीतल शिंदे यांनी ‘बंडखोरी’ करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नाट्यमयरित्या झालेल्या या घडामोडींमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. शीतल शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने पाठींबा दिला आहे. तसेच शिंदे यांनी शनिवारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना भेटून पाठींबा देण्याची विनंती देखील केली आहे. आज पुढील भूमिका मांडण्यासाठी शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले की, सभापतीपदासाठी पक्षातील सर्वांनीच मला हिरवा कंदील दिला होता. मात्र अचानकपणे काय झाले ते कळले नाही. माझ्यावरती अन्याय झालायं त्याला वाचा फोडण्यासाठी मी आज पत्रकारांशी संवाद साधत आहे. पक्षाच्या कोअर कमिटीत दरवर्षी स्थायीत प्रत्येकाला संधी देण्याचा निर्णय झाला होता. मी अर्ज दाखल केलायं, मी पक्षाचाच उमेदवार आहे. कुणीच माझा पत्ता कट केला नाही. नजरचुकीणं हे झालं असावं. मी पक्षाचा एकनिष्ठ आहे. मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे की, कोअर कमिटी मला न्याय देईल. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. संपूर्ण पक्षाचा मला पाठींबा असल्याचे शीतल शिंदे म्हणाले.
पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास तुमची भूमिका काय असणार..? बंडखोरी कायम ठेवणार का..? असे पत्रकारांनी विचारले असता शिंदे यांनी त्यावर स्पष्टपणे बोलणे टाळले. ते म्हणाले की, मी पक्षाचा निष्ठावंत आहे. कोअर कमिटी माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. पुढे काय करायचे ते त्या दिवशी बघू.. त्यामुळे शिंदे यांनी पुकारलेले ‘बंड’ आता ‘थंड’ झाले की काय..? असा सवाल उपस्थित झाला आहे. ‘बंड’ जर ‘थंड’ होणारच होते तर अर्ज भरण्याच्या दिवशी एवढा गदारोळ का केला गेला. ज्या भाजप सदस्यांनी पाठिंबा दिला ते आता तोंडावर पडणार नाहीत का..? याची उत्तरेही शिंदे यांना द्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. आता गुरूवार दि.७ रोजी स्थायी सभापती पदाची निवडणूक आहे. त्यावेळी शिंदे नेमकी काय भूमिका घेणार..? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.