पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेकडून शिरुरचे उमेदवार जाहीर होताच भोसरीतील भाजप गटाने तातडीची बैठक घेतली. यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या गटातील सर्व नगरसेवकांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार न करण्याचा पवित्रा घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी युती होण्याआधी केलेल्या आरोपांचं काय? असा सवाल नगरसेवकांनी यावेळी उपस्थित केला आहे. भोसरी विधानसभा सध्या शिवसेनेच्या कोट्यात असल्याने हे ‘दबावतंत्र’ वापरलं जात असल्याची चर्चा अाहे. अपक्ष निवडून आलेले महेश लांडगे हे भाजपमध्ये असल्याने, येत्या विधानसभेत हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची ग्वाही द्यावी, अशी मागणी केली देखील यावेळी करण्यात आली आहे.
आमदार महेश लांडगे सध्या सावध भूमिकेत असल्याचे या बैठकीतील चर्चेतून दिसून आले आहे. लांडगे युतीधर्म पाळू असं म्हणत असताना त्यांचे समर्थक नगरसेवक मात्र विरोधाची भाषा करत आहेत. दरम्यान महेश लांडगे नगरसेवकांना पुढे करुन स्वतःसाठी विधानसभेची जागा निश्चित करत असल्याचीही बोलले जात आहे.
यापूर्वी मावळ लोकसभेचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजप आमदार लक्ष्मण जगताप प्रचार करणार अशी परिस्थिती असताना आता शिरुरमध्येही भाजप आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवकांनी तीच रणनीती अवलंबली आहे. त्यामुळे मावळ पाठोपाठ शिरूरमध्येही शिवसेनेच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र आहे. आता वरिष्ठ नेते यावर काय आणि कसा तोडगा काढतात यावर शिरूरची समिकरणे अवलंबून आहेत.
























Join Our Whatsapp Group