पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने आता आणखी कठोर पावले उचलली आहेत. थुंकणे, मास्क न घालणार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्यांकडून आता १ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. १ हजार रूपयांचा दंड आकारण्याच्या निर्णयास स्थायी समितीने आज (दि.१६) मान्यता दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे हे होते. या निर्णयाबाबत माहिती देताना सभापती संतोष लोंढे म्हणाले की, शहरात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या ७० हजारांपर्यंत जाऊन पोहचली आहे. दिवसाला हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत.
या महामारीचा प्रसार थुंकीमधून अधिक वेगाने होतो. थुंकी सुकली नाही, तर पुढील काही तास या थुंकीतले विषाणू जिवंत राहतात आणि आजार बळावण्याची मोठी भीती असते. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये, असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे. परंतु, नागरिकांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.
यावर प्रतिबंध बसावा म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून धडक कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर यापूर्वी १५० रुपये दंड आकारला जात होता. तरी देखील नागरिकांमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यांनतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांकडून ५०० रुपये दंड वसूल केला जात होता. तरीही नागरिकांमध्ये कोणताही फरक पडताना दिसत नाही. त्यामध्ये आता पुन्हा वाढ करून दंड १ हजार रूपये केला आहे. या निर्णयास स्थायी समितीने आज मान्यता दिली आहे.

























Join Our Whatsapp Group