पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत असून, नवीन रुग्णांची संख्या घटत आहे. तसेच, बहुतांश रुग्ण होम आयसोलेशनचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात शहरातील ५ कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
भविष्यात रुग्णसंख्या आणखी कमी झाल्यास उर्वरित सेंटरही टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. मात्र, रुग्णसंख्या वाढल्यास बंद केलेले सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी दिली.
जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. दिवसाला बाराशे ते दीड हजारांपर्यंत रुग्ण आढळत होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत आहे. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमातून घरोघरी तपासणी केली जात आहे. संशयितांच्या घशातील नमुने तपासण्यात येत आहेत. या उपक्रमात २५ लाख लोकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, गुरुवारपर्यंत (दि.०१) १५ लाखांवर नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात केवळ अडीचशे व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. शिवाय, आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या ७९ हजार रुग्णांपैकी ७१ हजार रुग्ण बरे झाले आहेत. जवळपास एक हजार ३३० जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या साडेसात हजारांपर्यंत सक्रिय रुग्ण असून, साडेचार हजार रुग्ण महापालिकेच्या, तसेच एक हजार रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. कोणतेही लक्षणे नसलेले दोन हजार रुग्ण होम आयसोलेट आहेत. त्यामुळे महापालिकेने १६ पैकी महाळुंगे म्हाडा वसाहत, इंदिरा कॉलेज ताथवडे, डॉ. डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह, ईएसआय रुग्णालय चिंचवड, सिंबायोसिस कॉलेज किवळे येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
























Join Our Whatsapp Group